भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातील सम्रुद्ध आणि विविधतेनी नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणुन मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्यानी वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा मी करत आहे. त्यांचे कल्याण आणि समृद्धी यातचं माझे सौख्यं सामावलेले आहे.
हे अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून माझ्या मनावर जणू ठसवले गेलेले. आता भारत हा माझाच देश असेल तर माझ्या देशात मीच कसे वागायचे हे तुम्ही मला सांगणार का? भारत हा जसा माझा देश आहे तसाच तुमचाही देश आहे त्यामुळे जसे तुम्हाला वागायचे आहे तसे तुम्हीही वागा - माझी काही हरकत नाही. पण माझ्या स्वातंत्र्यावर बंधने आणणारे तुम्ही कोण? जर तुम्हाला घाण टाकायची असेल तर तुम्हीही टाका. मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे तेव्हा देश स्वच्छ ठेवायचा हे त्यांचे काम आहे आणि माझे नाही किंवा तुमचेसुद्धा नाही. तेव्हा त्यांचे काम करुद्या आणि आपण आपल्या रूढी परंपरा आणि संस्कृतीचे पालन करू.
साहेबाच्या देशातले रस्ते कसे चकाचक असतात त्यामुळे तिथे कोणी घाण टाकत नाही पण आपल्याकडे सगळेच घाण टाकतात मग फक्त मी एकट्यानेच स्वच्छ वागून काय अख्खा भारत स्वच्छ होणार आहे का? या सरकारच्या अपेक्षाच फार असतात. एकदा म्हणतात फार कचरा करू नका. मग सांगतात की ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून द्या. आम्हाला काय तेवढाच धंदा आहे काय? जाऊदे मरूदे तिकडं.
मी फक्त कचरा टाकला, पण लोक रस्त्यावर जाऊन काय काय करतात, त्यांना कधी मी सांगायला गेलो होतो का? साधे मॉर्निंग वॉकला जायचे तरी सक्तीने प्राणायाम करायला लागतो - काय खातात देव जाणे?
आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील कचरा सार्वजनिक जागी फेकणे ही आपली संस्कृती आहे. ह्याच आपल्या रूढी, परंपरा आणि संस्कार आहेत. अशी मानसिकता असणाऱ्या समाजात अजून काय होणार ? गेल्या सत्तर वर्षात एकच गोष्ट सिद्ध झाली आहे की पाठीवर कायम चाबकाचे फटकारे असल्याशिवाय आपला समाज सुधारणे अशक्य आहे.