Answer:
विठ्ठलाच्या भक्तिरसात स्वतःचे जीवन अनमोल बनवणारे संत तुकाराम हे एक महान अध्यात्मिक आणि वारकरी संत म्हणून ओळखले जातात. त्यांचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत. सतराव्या शतकात भक्ती आणि ज्ञानाने त्यांनी समाजप्रबोधनाचे उत्तम कार्य केलेले आपल्याला दिसून येते. त्यांचे अनेक अभंग आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत.
संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध ५, शके १५२८ म्हणजेच २२ जानेवारी १६०८ रोजी देहू या ठिकाणी झाला. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासात वेगवेगळ्या नोंदी आढळतात. त्यांच्या
वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई अंबिले असे होते. बोल्होबा आणि कनकाई अंबिले यांना तीन मुले होती. सर्वात मोठ्या मुलाचे नाव सावजी, मधला तुकाराम तर धाकट्या मुलाचे नाव कान्होबा असे होते.
तुकारामांच्या सुरुवातीच्या जीवनात त्यांना प्रापंचिक विघ्ने सहन करावी लागली. ते किशोर वयात असताना त्यांचे आई वडील वारले. मोठा भाऊ तीर्थयात्रेला गेला. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता. त्यांना एकूण चार अपत्ये होती. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. अशातच त्यांचे मन हळूहळू धार्मिक होऊ लागले.
विठ्ठल भक्ती आणि परमार्थ ते साधू लागले. संसारात राहूनच सर्व जबाबदाऱ्या पार पाडीत विरक्ती किंवा संन्यास न स्वीकारता ईश्वर भक्ती केली. संत तुकाराम यांनी भंडारा डोंगरावर बसून आत्मचिंतन केले आणि स्वतःचे खूप सारे साहित्य रचले. त्यावेळी समाजातील कटकारस्थानी लोकांनी तुकारामांना वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
समाजातील व्यर्थ गोष्टी, प्रथा आणि परंपरा यांवर त्यांनी परखड भाषेत टीका केली. ईश्वर भक्तीसाठी भक्तीचा सुगम मार्ग त्यांनी दाखवला. संत तुकाराम पंढरीच्या वारीला पायी चालत जाऊन प्रत्येक वर्षी आराध्यदैवत विठ्ठलाचे दर्शन घेत असत. त्यांचे विचार हे सामाजिक आणि वैयक्तिक उन्नती घडवून आणणारे होते.
तुकाराम महाराज हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करत असत. त्यांचे अभंग आणि कीर्तने ही सर्व साक्षात्कारी अनुभवातून अवतरलेली होती. तरीही त्याचा संदर्भ हा वेद पुराण आणि शास्त्रे यांच्याशी जोडून काही धर्मांध व्यक्तींनी त्यांच्या लिखाणाला आणि साहित्याला मान्यता नाकारली.
तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ बोलीभाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत
बुडवून टाकण्याची शिक्षा पुण्यातील वाघोली येथील रामेश्वर भट यांनी दिली. तुकारामांनी त्याबद्दल दिलेली ग्वाही योग्य असताना देखील वेदांचा अपमान झाला आहे आणि लोकांना भटकवण्याचे काम तुकाराम करत आहेत, असे मानून त्यांना ती शिक्षा देण्यात आली.
सर्व साहित्य बुडवल्यानंतरही हजारो लोकांच्या तोंडी त्यांचे अभंग पाठ होते. आपले लिखित साहित्य लोकांच्या ध्यानी मनी जिवंत आहे हे पाहून तुकाराम सुखावले. त्यांच्या सर्व साहित्याला “तुकारामांची गाथा” असे म्हणतात. त्यांनी सामान्य लोकांनाही खरा धर्म अगदी साध्या सोप्या भाषेत समजवला. भागवत धर्म खऱ्या अर्थाने सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले.
जेव्हा त्यांना आत्मसाक्षात्कार होत गेला तेव्हा त्यांनी सावकारी आणि संसारातून फारकत घेतली. त्यावेळी भयानक दुष्काळ पडला असता त्यांनी स्वतः घरातील धान्य वाटप केले आणि गरीब लोकांचे कर्ज माफ केले होते. सदेह संसारात असून देखील परमार्थ साधला. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम अनंतात विलीन झाले आणि ते वैकुंठाला गेले, असे मानले जाते. त्यांचा निर्वाण दिवस हा “तुकाराम बीज” म्हणून ओळखला जातो.
Explanation:
hope it helps